MENU

Fun & Interesting

कोकणातील जंगलात सापडल्या पुरातन रहस्यमय जैन मूर्ती आणि शिल्प । एक रहस्यमय आणि सुंदर गाव " पेंडुर "

Sanchit Thakur Vlogs 29,441 4 years ago
Video Not Working? Fix It Now

पेंडुर येथील या जैनाच्या डोंगरावर अतिप्राचीन सुमारे दीड हजार वर्षापूर्वीची संकीन-डंकीनची शिल्प पाहायला मिळतात. आंबिका मातेची आठवण येते. पिंपळ आणि अष्टाच्या अजस्त्रमुळांनी मगरमिठी घातल्यानंतरही अंबिका मातेचे शिल्प  आपले अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहे.तिच्या कडेवर असलेले बाळ..ऊन-पावसाने हैरान झाले आहे. हे सगळं पाहताना मन थराथरून जाते. अंगावर काटा उभा राहतो.हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आणि भूगोलही डोळय़ांसमोर तरळू लागतो. शिल्पकाराची नेत्रदीपक कलाकृती आणि या भूमीचा धार्मिक इतिहास मग प्रज्वलीत होतो. नजर भिर-भिरते, येथील देखण्या शिल्पकृती हजारो वर्षाचा इतिहास सांगणा-या पाषानांना पाय फुटल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात तेव्हा अष्टाच्या झाडाची मगरमिठी ही आईच्या पदराप्रमाणे वाटते. अंबिका मातेचे हे शिल्प या वृक्षाच्या पदराखाली सुरक्षित आहे असे वाटू लागते. नाही तर तेही बेपत्ता झाले असते..  हे वास्तव पेंडुर कट्टा येथील सातेरी मंदिरापासून जवळ असलेल्या डोंगरावरचे आणि तेथील भग्नावस्थेत असलेल्या पाषाणांचे! आम्हाला आमच्या इतिसाबद्दल तेवढीशी ओढ नाही.त्याची जपणूक करावी याचेही भान नाही. या उदासीनतेमुळे अनेकांचे फावले आहे. इतिहासप्रेमी म्हणणा-या मंडळींनी येथील साक्षीदारांना सहजगत्या उचलून नेले.किल्ल्यावरच्या तोफा जशा नाहीशा झाल्या तशी देवराईत असलेली पाषाणे (विरगळ) हेही नाहीसे झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात या प्राचीन पाषाणांना मोठी किंमत आहे. हे मान्य असले तरी आम्ही आमच्याकडे असलेल्या खजिन्याबाबत तेवढेसे जागरूक नाही आहोत, याचेही भान ठेवायला हवे. कोकणात अनेक सत्तांतरे झाली आणि आपणही बदलत गेलो. कधी काळी सिंधुदुर्गात म्हणजे बाराशे वर्षापूर्वी जैन धर्माला मानणा-या शिलाहार राजांची सत्ता कोकण प्रांतावर होती. त्यांच्या काळात जैन संस्कृती येथे रुजली आणि वाढलीसुद्धा.. मात्र सत्ता बदल झाला, धर्म बदल झाला आणि सिंधुदुर्गात मंदिरांची रचनाही बदलली. येथे जैनांची असलेली धार्मिक स्थळे कालौघात नष्ट झाली;परंतु त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही आढळतात. सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणी जंगलात आड बाजूला डोंगरदऱ्यांमध्ये त्या काळातील सुरेख मूर्ती ऊन-पावसाचा मारा झेलत आजही उभ्या आहेत. हजार – दीड हजार वर्षापूर्वीचा हा अमूल्य ठेवा जंगलात खितपत पडला आहे. पेंडुर(तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग)मधील संकीन आणि डंकीन या स्थळावरची शिल्प अशीच लक्ष वेधून घेतात. या मूर्तीचा मोठा खजिना आपण जपायला हवा. या  शिल्पांना बोलके करायला हवे.हजार वर्षापूर्वीचा इतिहास आणि संस्कृतीचा भूतकाळ जागृत करायला हवा. शिलाहार राजवटीत अपरांतात जैन धर्माचा प्रभाव होता. आठव्या शतकात राष्ट्रकुटांनी चालुक्याचे अधिपत्य झुगारून सत्ता स्थापन केली. राष्ट्रकुट नृपती गोविंद (तिसरा) या राजाने उत्तर कोकणाच्या राज्यकारभाराची जबाबदारी कपर्दिस (पहिला) याच्यावर सोपविली. ही शिलाहारांची पहिली शाखा. दक्षिण कोकणावर प्रभाव असलेल्या कृष्ण राजाने या भागावर शिलाहार वंशातीलच सणफुल्ला याची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. येथून शिलाहारांच्या कोकणातील कारकिर्दीला प्रारंभ झाला. अकराव्या शतकापर्यंत शिलाहारांची दुसरी शाखा दक्षिण कोकणात म्हणजे गोवा ते रत्नागिरी या भागावर राज्य करीत होती. त्यांची पहिली राजधानी गोव्यातील. त्यावेळचे चंद्रपूर ऊर्फ गोपकपट्टण म्हणजे आताचे चांदोर येथे होते. त्यांनी नंतर ही राजधानी सिंधुदुर्गातील बलिपट्टण म्हणजे खारेपाटण येथे हलविली. शिलाहार राजा श्वम्मीयराने खारेपाटणमध्ये किल्ला आणि बंदर उभारून ही राजधानी वसविली. या राज्याचा कार्यकाल ७८५ ते ८२० या दरम्यान होता. पुढे अकराव्या शतकापर्यंत त्यांचा ब-यापैकी प्रभाव राहिला. हे सर्व सांगायचे कारण एवढेच की, त्यांच्या राज्यादरम्यान सहयाद्रीच्या द-या-खो-यात जैन संस्कृतीचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रसार वेगाने झाला. याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. परंतु मुद्दा हा की, या प्रांतात असलेल्या जैन धर्माच्या खुणा आजही पाहायला मिळतात. बुद्धोत्तर आणि अशोकपूर्व कालखंडात जैन धर्म गोमांतकात आल्याचे मानले जाते. पुढे उपेक्षा, परकीयांची आक्रमणे आणि नैसर्गिक प्रकोपामुळे जैनधर्मियांच्या मूर्ती, श्रद्धास्थाने आणि वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या. शिलाहार राजांचा प्रभाव संपल्यानंतर या धर्माचा प्रभावही ओसरत गेला.कारण याचे आचरण सोपे नाही. ब्रह्मचर्य, आहारामधील पावित्र्य ही कठीण बाब होती. याचा फटका जैन धर्माला बसला. परकीय शत्रूंच्या हल्ल्यात पळवापळवीच्या काळात धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू झाले. यावेळी काही मूर्ती लपविल्या गेल्या आणि काही मूर्ती अज्ञात स्थळी टाकण्यात आल्या. सिंधुदुर्गातील पेंडुर येथील जैन धर्मियांचे प्रार्थना स्थान आणि येथील भग्न पाषाणे हा गतकाळ जागृत करतात.या पेंडुरच्या जंगल परिसरात अशी अतिप्राचीन पाषाणे लोटून टाकण्यात आली आहेत. जिल्हयाच्या धार्मिक क्षेत्रातही जैन धर्माचा प्राचीन प्रभाव आजही जाणवतो. मसुरे, माणगाव, काळसे या गावांमध्ये जैन संस्कृतीच्या खाणाखुणा, गावऱ्हाटीत मुद्दामहून केली जाणारी जैन स्थळाची आठवण, काही ठिकाणी असलेली जैन ब्राह्मणांची मंदिरे, कट्टा येथील जैनांची विहीर, कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील मारुतीच्या मंदिरातील जैनाचा धोंडा आदी खुणा पाहायला मिळतात. जैन धर्माचे प्रथम र्तीथकर आदिनाथ यांच्या नावाने ओळखली जाणारी काही स्थळे आणि डोंगरही जिल्हयात आहेत. या मूर्तीना ऊन, वारा, पावसाच्या मा-याबरोबरच चोरटय़ांपासून धोका आहे. कोकणात प्राचीन मूर्ती चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जैन धर्माशी संबंधित अनेक मूर्ती आज ऊन-पावसात उभ्या आहेत. त्यांचे जतन होण्याची गरज आहे. हा ठेवा खूप प्राचीन असल्याने राज्यकर्त्यांनी त्यासाठी ठाम भूमिका घेऊन धोरण ठरविणे गरजेचे आहे. Follow us - Email - [email protected] Instagram https://www.instagram.com/sanchitthakurvlogs__ Facebook - https://www.facebook.com/SanchitThakurVlogs #कोकण #पेंडुर #रहस्यमयमूर्ती #कोकणगाव

Comment