एका प्रामाणिक आणि सच्च्या कलावंताचा गौरव..
कोणत्याही माणसाच्या आयुष्यात तो जन्माला येऊन काय करून जातो हे महत्त्वाचे असते. जन्माला येणं आणि निघून जाणं हे आपल्या हातात नसले तरी त्याच्यामधील जगणं आपल्या हातात हातात असतं. मग हे करताना जिद्द, चिकाटी,ध्यास या जोरावर माणूस आपल्या स्वतःच्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थानावर जाऊ शकतो.
महाराष्ट्र निर्मितीच्या साठ वर्षाच्या काळात ज्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची सुरुवात वेगळ्या दिशेने करून उच्च स्थान गाठले अशा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तीसंपन्न अशा व्यक्तींचा गौरव महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षात महाराष्ट्राची गिरीशिखरे म्हणून शासनाच्या वतीने जो गौरव केला जात आहे त्यामध्ये एका कष्टाळू, तमाशा कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या हसनभाई पाटेवाडीकर यांचा गौरव होणं ही त्यांच्या आणि आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट ठरली आहे.
हसनभाई पाटेवाडीकर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक तमाशा कलावंत. तमाशा कलेत सातत्य ठेवून सतत काहीतरी करण्याची धडपड. प्रामाणिकता,विनयशीलता, दुसऱ्याविषयी तोंड भरून बोलण्याची त्यांची सवय त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळवून देणारी ठरली आहे. त्यांनी अनेक मोठ्या तमाशा फडात कलावंत म्हणून काम केले. काही दिवस स्वतःचा तमाशा फड चालविला. आपली स्वतःची ऑडिओ कॅसेट काढून लोकांच्यापर्यंत पोहोचवली. हे त्यांचे काम विचारात घेण्यासारखे आहे.
हसनभाईंच्या जीवन प्रवासात दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी मुरलीधर शिंदे यांना बरोबर घेऊन काही वर्षांपूर्वी पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान स्थापन केले होते. तमाशा कलेतील सर्व तमाशा कलावंत आणि फडमालक एकत्रित यावेत यासाठी त्यांचा छोटासा प्रयत्न होता. त्यांच्या एका कार्यक्रमाला जाण्याचे भाग्य मला लाभले होते. विशेष म्हणजे या प्रतिष्ठानमार्फत दोन ज्येष्ठ तमाशा कलावंतांना पुरस्कार दिले जायचे आणि त्यासाठी आदरणीय रघुवीर खेडकर भाऊ हे स्वतः या पुरस्काराची रक्कम देत होते. त्यातील एक पुरस्कार कै.तुकाराम खेडकर यांच्या नावे होता. खूप चांगले कार्यक्रम या प्रतिष्ठानमार्फत नारायणगावला राहुटीच्या ठिकाणी होत होते. पण पुढे या प्रतिष्ठानचे काम का थांबले हे माहित नाही.
दुसरे असे की मधल्या कोरोनाच्या काळात हसनभाईनी उदरनिर्वाह करताना आपल्या मोपेड वरून कोरोना विषयीची जनजागृती केली. कलावंत हिंमतवान असला पाहिजे, व्यसनापासून दूर असला पाहिजे, इतर काही गैर त्याने करू नये, इतरांच्यासाठी, समाजासाठी त्याने काही करावे ही अपेक्षा या तमाशा कलावंताने पूर्ण केली आहे. म्हणून हसनभाईंच्या कार्याला सलाम आहे. त्यांचा होत असलेला हा गौरव म्हणजे तमाशा क्षेत्राची उंची वाढविणारा आहे.
हसनभाई तुमच्या कार्याला, धडपडीला सलाम.
Instagram link:- https://instagram.com/mr_ashfaq_025