आर जे, अर्थात रेडिओ जॉकी असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या नजरसोमर साधारणपणे एखादी मॉर्डन, हायफाय व्यक्ति येते. पण आज आपण एका अगदी पारंपारिक, अस्सल मातीतल्या आरजे केराबाईंना भेटणार आहोत. नउवारी साडी, कपाळाला भलंमोठं कुंकु, डोईवर पदर,हातभर हिरव्या बांगड्या, कंबरेला चांदीचा कंबरपट्टा, पायात ठोकाळ जोडवी असं त्यांचं रुप. केराबाई आहेत साठीच्या पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणार आहे. रेडिओचे कोणत्याही प्रकारचे पारंपरिक/व्यावसायिक प्रशिक्षण न घेता केवळ गाण्याची आवड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर माण तालुक्याच्या ग्रामीण भागातील केराबाईंसारख्या अनेक महिला शहरातील अगदी नामांकित संस्थेतून प्रशिक्षिण घेतलेल्या आरजेंनादेखील लाजवतील अशा स्वरूपात आपल्या श्रोत्यांसाठी माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करत असतात.
पूर्वीच्या काळी जात्यावर दळताना, धान्य कांडताना बायका गाणी गायच्या किंवी ओव्या म्हणायच्या. यातुन त्यांचं सुख, दुःख, आनद, निराशा सारं काही प्रतित व्हायचं. केराबाई याच पांरपारिक गाणी आणि ओव्यांच्या ठेव्यातून आजच्या काळातल्या ग्रामीण भागातील स्त्रियांचं आयुष्यं आपल्या नजरेसमोर उभं करतात.
म्हसवडपासून सातआठ किलोमीटरवर असलेलं कायम दुष्काळ असलेलं दीडमुखवाडी हे त्यांचं गाव. एकदा त्या
म्हसवडला बाजारात गोधड्या विकायला गेल्या होत्या तिथल्या बायकांनी त्यांना या रेडिओ स्टेशनची माहिती दिली.
सुरुवातीला सगळंच नवं होतं. पण केराबाईंनी सारं काही शिकून घेतलं. आणि आज जेव्हा त्या बोलतात तेव्हा आपण तल्लीन होऊन त्यांचं बोलणं ऐकतच राहतो.