कांद्याच्या बिजोत्पादानाची पद्धत :
कंदापासून बियाण्याची पद्धत :
कंद तयार झाल्यानंतर काढून घेतात व चांगल्या रीतीने निवडून पुन्हा शेतात लागवड करतात. यामुळे कंदाची योग्य निवड शक्य होते. शुद्ध बियाणे तयार होऊन उत्पन्नदेखील जास्त प्रमाणत येते. या पद्धतीत खर्च वाढतो व वेळ देखील जास्त लागतो. तथापि, बीजोत्पादनासाठी हीच पद्धत योग्य आहे.
एकवर्षीय पद्धत
या पद्धतीमध्ये मे-जून महिन्यात पेरणी करून रोप लावणी जुलै-ऑगस्टमध्ये करतात. नोव्हेंबर महिन्यात कंद तयार होतात. कंद काढून निवडून घेतले जातात. चांगल्या कंदांची १०-१५ दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे मे महिन्यापर्यंत बियाणे तयार होते. एक वर्षात बियाणे तयार झाल्याने यास एकवर्षीय पद्धत म्हणतात.
द्वीवर्षीय पद्धत :
या पद्धतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बियाणे पेरावे व रोपे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीस शेतात लावावे. मेपर्यंत कांदे तयार होतात. निवडलेले कांदे ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित साठवून ठेवावेत. नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडून चांगल्या कंदांची शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे बियाणे तयार होण्यासाठी जवळपास दीड वर्ष वेळ लागतो. म्हणून यास द्वीवर्षीय पद्धत म्हणतात.
हवामान व जमीन :
कांदा हे मुख्यत: हिवाळी हंगामातील पीक आहे. त्यांच्या उत्तम वाढीसाठी रात्रीचे १४ ते २१ अंश सेल्सिअस तापमान, ११ ते १२ तास स्वच्छ सूर्यप्रकाश, ७० ते ७५ टक्के आर्द्रता आवश्यक असते.
पिकासाठी सुपिक, मध्यम ते मध्यम भारी, वाळूमिश्रित, भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी, ६.५ ते ७.५ सामू असणारी जमीन हवी.
पूर्वमशागत :
कांदा जमिनीत वाढणारे पीक असल्यामुळे २-३ नांगरण्या, वखरण्या करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी एकरी १५-२० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत पसरावे व वखराची पाळी देऊन मिसळावे.
जातींची निवड :
महाराष्ट्रात बिजोत्पादानासाठी नाशिक लाल, नाशिक-२४१ (गावरान), पूना फुरसुंगी, फुले समर्थ, प्रशांत, पंचगंगा, गाजनन, ईस्ट वेस्ट, इ. जातींची निवड करतात.
पुणे-फुरसुंगी जातीच्या बियाण्याची कमतरता लक्षात घेताबीजोत्पादनातून फायदा मिळतो. पुणे-फुरसुंगी जातीमध्ये कांदे काढणीनंतर अधिक काळ टिकण्याची क्षमता असल्याने त्या जातीची निवड करतात. या कांद्याला दर चांगला मिळत असल्यामुळे बियाण्याचीही किंमतही अधिक असते.
रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी नाशिक-२४१ ही जात निवडावी. ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी चांगली आहे. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक आहे.
बीज प्रक्रिया :
पेरणीपूर्वी बियाणास नॅप्थॅलीन अॅसेटिक अॅसिड किंवा इंडॉल ब्युटेरिक अॅसिडच्या १० पी.पी.एम.च्या द्रावणात ४ तास भिजवून ठेवावे. नंतर सावलीत वाळवावे. त्यानंतर त्यास २ ग्रॅम थायरम व १ ग्रॅम बाविस्टीन प्रतिकिलो बियाणास लावावे.
कांदे लागवडीपूर्वी बावीस्टीनच्या ०.१ टक्केद्रावणात बुडवून वरच एक तृतीयांश भाग कापून लावावा. एकरी १० क्विंटल (एकसारखे, मध्यम आकाराचे, निरोगी कांदे) बियाणे पुरेसे होते.
कांदा लागवडीचे
रोपे तयार करणे :
रोपे तयार करण्यासाठी वाफ्यांची जागा उंच व पाणी देण्यास सुलभ अशा ठिकाणी निवडावी.
लागवड :
कंद लागवडीसाठी सरासरी ७० ते ८० ग्रॅम वजनाचे साडेचार ते सहा सेंटिमीटर आकाराचे कांदे निवडावे. कापलेल्या कांद्यामधून केवळ एक डोळ्याचे कांदे लागवडीसाठी वापरावेत. सरी पद्धतीने लागवड करताना ९० बाय ३० सें.मी. अंतरावर कापलेल्या कांद्याची लागवड करावी.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन :
वाफ्यावर २ चौरस मीटर जागेला २ किलो बारीक केलेले शेणखत, २५ ग्रॅम म्युरेब ऑफ पोटॅश बियाणे पेरणीपूर्वी द्यावे. यूरियाचा दुसरा हप्ता २५ ग्रॅम २५ दिवसांनी द्यावा. लागवडीनंतर ८ दिवसांनी एकरी ५ किलो १९:१९:१९ या विद्राव्य खतासोबत एक लिटर ह्यूमिक ऍसिड व ५०० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड यांची आळवणी करावी. लागवडीनंतर एक महिन्याने एकरी २५ किलो मॅग्नेशिअम, १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य, डीएपी २५ किलो व पोटॅश ५० किलो असा डोस द्यावा. नत्र खत दोन भागात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
जमिनीचा मगदूर व पिकाची गरज लक्षात घेत पाणी व्यवस्थापन करावे लागते. पाणी नियोजन करताना जमिनीचा मगदूर व पिकाची वाढीची अवस्था यानुसार पाणी द्यावे.
तण नियंत्रण :
३-४ खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
पीक संरक्षण :
कांदा पीकाप्रमाणेच किड व रोगांचे नियंत्रण करावे. लागवडीनंतर १०, २५, ४० व ५५ दिवसांनी नियमितपणे कीड, रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनाशकाच्या चार फवारण्या द्याव्यात.
परागीकरणासाठी मधमाश्यांच्या पेट्यांची व्यवस्था :
कांदा बीजोत्पादनात परागीकरणाला महत्त्वाचे स्थान असते. कांदा फुलोऱ्यात आला तेव्हा मोसंबीही फुलोऱ्यात आल्याने परागीकरण चांगले होण्यासाठी सुमारे तीन एकरांत मधमाश्यांच्या दोन पेट्या ठेवाव्या.
उत्पादन :
कांद्याचे बियाण्यासाठी एकरी ३-५ क्विंटल इतके उत्पादन निघते. साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.
जातींची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण :
कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते. दोन जाती बीजोत्पादनासाठी दीड कि.मी.च्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात डेंगळे आले, तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही. तेव्हा, जातींची शुद्धता राखण्यासाठी दोन जातींमध्ये बीजोत्पादन करते वेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय बीजोत्पादनाच्या शेजारी कांदा लागवड केली असेल आणि त्यात डेंगळे आले असतील, तर फुले उमलण्याअगोदर डेंगळे तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
- डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर.
(एम.एस.सी., पी.एच.डी. होर्टी.)
अधिक माहिती :
http://krushisamarpan.blogspot.com/2015/12/blog-post_22.html?hcb=1&m=1