कंपनीच्या गाडीतून जाण्याचा योग त्या दिवसानंतर पुन्हा कधी आला नाही. पण चित्रीकरणाला मात्र पूर आला. वेगवेगळ्या निदान पंचवीस भूमिका गदिमांनी वठवल्या. विनायकांकडून अभिनयाचे बहुमोल शिक्षण मिळाले. पण पोटाचा प्रश्न मात्र सुटत नव्हता. हेरवाड्याच्या मुलांच्या शिकवण्या आपोआपच सुटल्या होत्या. खाणावळवाले वायदे मानायला तयार नव्हते. पगाराच्या दिवशी गदिमा उदास अवस्थेत बसले होते. कारण त्यांना पगार मिळणार नव्हता. बरोबरचा एक नट सहानुभूतीने म्हणाला "कशाला आलायस या दरिद्री धंद्यात? त्यापेक्षा कुठंतरी मास्तर हो"!