MENU

Fun & Interesting

ज्ञानेश्वरी - अध्याय सातवा

Video Not Working? Fix It Now

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतील उत्तमोत्तम अशा निवडक ग्रंथांचे श्राव्यपुस्तकांत म्हणजेच ऑडिओ बुक्स मध्ये रूपांतर करून त्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेने हा प्रकल्प हाती घेतलेला आहे. याआधी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रज व विंदा करंदीकर यांचे प्रत्येकी दोन प्रातिनिधिक कवितासंग्रह, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांचे आत्मचरित्र तसेच समर्थ रामदासस्वामींचा दासबोध या ग्रंथाचे श्राव्यपुस्तकात रूपांतर करण्यात आले होते. राज्य मराठी संस्थेच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या या अनमोल ठेव्याला जागतिक स्तरावरून आजही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मध्ययुगातील संतांचे विविधांगी वाङ्मय हा मराठी साहित्यातील महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. वारकरी भक्तिसंप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्या ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आजही अनेकांच्या नित्यपठणात असलेला आढळतो. संस्कृतातील भगवद्गीतेमध्ये मांडलेले तत्त्वज्ञान तत्कालीन मराठी समाजापर्यंत पोहोचावे या हेतूने संतश्रेष्ठ ज्ञानेधर महाराजांनी भगवद्गीता मराठीत आणताना त्याला भावार्थदीपिका असे यथार्थपणे म्हटलेले आहे. या ग्रंथातून केवळ संस्कृतातील भगवद्गीतेचे तत्त्वज्ञानच मराठीत आणले गेले असे नाही तर तत्कालीन मराठी शब्दकलेचे लखलखीत आरस्पानी दर्शन त्यातील प्रतिमा प्रतीकांतून होते. ज्ञानेश्वरांचा व्यासंग, निरीक्षणातील बारकावे, भक्तिसंप्रदायातील अनेकविध विशेष हा ग्रंथातून प्रकट झाले आहेत. या श्राव्यपुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या संपादन समितीने प्रमाणित केलेली व महाराष्ट्र शासनाद्वारा १९७७ साली प्रकाशित केलेली ज्ञानेश्वरीची प्रत (पुनर्मुद्रण १९९१ व २०१७) या श्राव्यपुस्तकासाठी वापरली आहे. या ग्रंथामधील १८ अध्यायांमध्ये ९०३४ ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीचे संशोधन करून त्यांची शुद्धप्रत केल्यानंतर एकनाथ महारांजानी रचलेल्या ५ ओव्यादेखील १८ अध्यायांनंतर या प्रतीत प्रकाशित केलेल्या आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या या श्राव्यपुस्तकात एकूण ९०३९ ओव्या ध्वनिमुद्रित केल्या आहेत. गेल्या चार दशकांपासून मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात संगीतकार म्हणून नावाजलेल्या श्री. राहूल रानडे यांनी या श्राव्य पुस्तकासाठी संगीतदिग्दर्शन केले असून मराठीतील बावीस नामवंत कलाकारांच्या ओजस्वी आवाजात हा ग्रंथ ऐकता येणार आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या नामवंत कलावंतांकडून ध्वनिमुद्रित करून घेताना शब्दांचे उच्चारण, वृत्त, छंद यांची तसेच स्वाभाविक लय, गती व नाद यांची विशेष काळजी घेतली गेली आहे. तसेच ज्ञानेश्वरीतील त्या काळातील विशिष्ट शब्दाचे अर्थ कळणे कठीण आहे असे वाटल्यास अशा काही शब्दांचा आजच्या व्यवहारातील अर्थ लोकांना तिथेच बघता यावा यासाठी आवश्यक ती सोयदेखील करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी या श्राव्य पुस्तकाचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून हे पुस्तक जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यांची विक्री करणे, ती आपल्या संकेतस्थळावर घालणे इत्यादी गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. हे श्राव्यपुस्तक तयार करण्यासाठी ज्या ज्या व्यक्ती, संस्था यांचे बहुमूल्य साहाय्य व सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद !

Comment