कार्यारंभी तुला पूजावे, गणनायक गणपती |
देव हा देवांचा अधिपती ||धृ||
मंगलदायक विश्वविनायक, मंगलकारक गुणिजनपालक |
बुद्धीचा भगवंत पावतो, देऊनी सुख शांती ||१||
मंगलकारी मूषक रूपे, काळ ही अवघा थर थर कापे |
रिद्धी सिद्धी त्या उभ्या निरंतर, गजवदना सांगाती || २||
मूळमंत्र ओंकार गजानन, आधारच हा सर्व सुखाचा |
रात्रंदिन म्हणा निरंतर, ओम नमो गणपती ||३||