सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठी विठोबाचे ।। तयाच्या चिंतने निरसेल संकट । तराल दुर्घट भवसिंधु ।। जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम । धरी हाचि नेम अहर्निशी ।। तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत । भावे गाता गीत विठोबाचे ।।