अंतरंगातला देव गावंल का ?
बघ उघडूनी दार,
शोधुन शिणला जीव आता रे
साद तुला ही पोचंल का
दारोदारी हुडकलं भारी
थांग तुझा कधी लागंल का
शाममुरारी, कुंजविहारी
तो शिरीहारी भेटंल का
वाट मला त्या गाभाऱ्याची
आज कुनी तरी दावंल का
बघ उघडुनी दार, अंतरंगातला देव गावंल का तान्ह्या बाळाच्या हासे रं डोळ्यांत तो
नाचे रंगुन संतांच्या मेळ्यात जो
तुझ्या - माझ्यात भेटेल साऱ्यात तो
शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहातो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी राऊळी
बाप झाला कधी जाहला माउली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावंल का
बघ उघडूनी दार,अंतरंगातला देव गावंल का ?
राहतो माउलीच्या जिव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
नाचवे वीज जो त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवुनी लाट ये जो किनाऱ्यावरी
तोल साऱ्या जगाचाही तो सावरी
राहतो तो मनी या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावंल का
बघ उघडुनी दार,अंतरंगातला देव गावंल का ?