महाराष्ट्र प्रांतिक च्या युवा शिबीर मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्धन करण्यासाठी लातूर येथून डॉ. विठ्ठल लहाने उपस्थित होते. ३ दिवसीय शिबिराच्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी पहिल्या सत्रात त्यांनी आपले भाषण केले. रुग्णांची मनोभावे सेवा करून तरीही प्रसिद्धीपासून अलिप्त असलेल्या डॉ विठ्ठल लहाने यांची हि कहाणी. प्रेरणादायी भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले लहाने आपला संघर्ष युवा शिबीर मध्ये झालेल्या आपल्या भाषणात सांगतायत.
बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. विठ्ठल लहाने यांनी वैद्यकीय शिक्षण मुंबईत घेतलं. त्यानंतर महागड्या वाटणाऱ्या वैद्यकीय सुविधा लातूरसारख्या छोट्या जिल्ह्यातल्या रूग्णांनाही मिळाल्या पाहिजे यासाठी त्यांनी लातूरमध्ये लहाने हॉस्पीटल सुरू केलं. १८ वर्षांच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डॉ. लहाने यांनी ८ हजारांपेक्षा अधिक मोफत सर्जरी या फक्त दुभंगलेले ओठ आणि टाळू यांच्याच केल्या आहेत. अजूनही सामाजिक जाणिवेतून अशा मोफत सर्जरी सुरूच आहेत. अशा महागड्या सर्जरी सामान्यांना मोफत उपलब्ध करून देत डॉ. लहाने यांनी वैद्यकीय सेवेत मोठं योगदान दिलं आहे. आजवरच्या अनुभवात चांगली लोकं भेटली हाच चांगला अनुभव असल्याचं डॉ. लहाने सांगतात.
जन्मजात व्यंगामुळे मायेला पारख्या झालेल्या कुरूपांना सुरूप देऊन त्यांच्या जीवनात आनंदाची पखरण करण्याचे काम येथील प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने करत आहेत. त्यांच्या या सेवाकार्याने 1300 मुला-मुलींची लग्ने जुळली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा हा स्वभाव उजळ झाला असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. अशा रुग्णांच्या सेवेसाठी आता त्यांनी अद्ययावत केंद्र सुरू केले आहे.
दुभंगलेले ओठ व टाळूच्या समस्येने ग्रस्त असलेल्या बालकांना बोलता येत नाही की, नीट दूध पिता येत नाही. भारतात दरवर्षी 40 हजार बालके अशी कुरूपता घेऊन जन्माला येतात. अनेक जण दैवी कोप म्हणून अशा बालकांचे तोंड पाहणे टाळतात. त्यांना कार्यक्रमात नेले जात नाही. घरी पाहुणे आले की, लपवून ठेवले जाते. सततचा थट्टेचा विषय झालेली ही बालके पुढे शाळेत जात नाहीत. वयात आली की त्यांची लग्नेही जुळत नाहीत. योग्य वेळेत शस्त्रक्रिया केली, तर हे व्यंग घालवता येते, परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणारा 30 ते 35 हजारांपर्यंतचा खर्च झेपत नसल्याने हे व्यंग वागवतच अनेकांना जगावे लागते. अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे काम डॉ. लहाने करीत आहेत. त्यांना या कामी स्माइल ट्रेन ही आंतरराष्ट्रीय संस्था सहकार्य करीत आहे.
स्पर्धा ही पूर्वीही होती,आजही आहे आणि उद्याही असणार आहे.स्पर्धेचा बागुलबुवा तयार करून पाल्यांना कष्टापासून दूर ठेऊ नका,लेकरांना कष्ट करु द्या. ”कष्टाची सवय” हा यशस्वी जिवनाचा पाया आहे. असे प्रतिपादन प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी व्यक्त केले.