ऑक्सफर्ड विद्यापिठ, मायक्रोसॉफ्ट व बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांनी संयुक्तपणे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर कृषी क्षेत्रात करण्यासाठी गेली 3 वर्ष संशोधन करुन कृषी विज्ञान केंद्र, बारामती इथं यशस्वी चाचणी घेतली. यानंतर आता "आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फॉर अॅग्रीकल्चरल टेक्रॉलॉजी अॅड क्लायमेट चेंज इन शुगरकेन फार्मिंग" हा प्रकल्प राज्यभरातील सुमारे 1000 शेतकऱ्यांच्या शेतात राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. बारामतीत येष्ठ नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. हे संशोधन फक्त शेतकऱ्यांपुरतं मर्यादीत न ठेवता संशोधक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व उद्योजकांना देखील उपलब्ध करुन देण्याचा तिन्ही संस्थांचा मानस आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा प्रभावी वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेती कशी करता येईल यावर या प्रकल्पात काम होणार आहे. लहरी हवामानाचा फटका बसू न देता, खत व पाण्याचा सुयोग्य वापर करुन, कमी खर्चात अधिक टनेज व अधिक साखर उतारा देणाऱ्या ऊस पिकाची निर्मिती राज्यात करण्याचा प्रयत या प्रकल्पातून केला जाणार आहे. याबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स ऊस शेती व्यतिरिक्त फळबाग व भाजीपाला शेतीलाही उपयोगी ठरेल असा संशोधकांचा विश्वास आहे. येणा-या काळात हे संशोधन कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरून कांती आणेल