भू आणि जल संधारणाच्या स्थायी उपचारांबरोबरच अत्यंत अल्प खर्चाचा पर्याय म्हणजे पावसाळा संपण्याच्या वेळी पावसाची तीव्रता आणि पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याने त्यावेळी गावोगावी, जागोजागी पाण्याच्या प्रवाहात माथ्यापासून सुरुवात करून, गावापर्यंत कमी उताराच्या जागा शोधून त्यावर दगड-मातीचे कच्चे बंधारे किंवा दगड-माती व सिमेंटच्या रिकाम्या पोत्याच्या सहाय्याने वनराई स्वरुपाचे बंधारे घालणे गरजेचे आहे. असे केल्याने भरपूर पाणीसाठा निर्माण केला जाऊन जनावरांच्या पिण्याच्या माध्यमातून उत्पन्न व रोजगारनिर्मिती असा बहुउद्देश साध्य होतो.
वनराई बंधार्यासाठी जागेची निवड
1. प्रथम नाल्याची पाहणी करावी व जेथे नाला खोलगट असून तळ उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
2. दोन्ही बाजूंना स्पष्ट काठ आहेत.
3. नालापात्रात वाळू व बाजूला मातीची उपलब्धता आहे.
4. जवळ पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे.
सर्वसाधारणपणे अशा जागेची निवड करून त्यांची लांबी मोजून घ्यावी.
वनराई बंधार्याचे फायदे
1. फक्त सिमेंटच्या रिकाम्या गोण्या, वाळू, माती एवढीच सामग्री लागते.
2. नालापात्रात ज्या ठिकाणी उतार अत्यंत कमी, परंतु नालाकाठ स्पष्ट नाहीत, नालाकाठाला दगड नाही व त्यांची उंची अत्यंत कमी असल्यामुळे तेथे मातीचे नालाबांध व पक्के सिमेंटचे बंधारेही घेता येत नाहीत.
3. नाल्याच्या बाजूला जमीन सखल असून, तेथे पक्के बंधारे घेतल्यास पावसाळ्यात पाणी नाला पात्रातून ओसंडून सखल भागातील जमिनीची धूप व उभ्या पिकाचे नुकसान करू शकते.
4. गावोगावी श्रमदानाच्या माध्यमातून, अत्यंत अल्प खर्चात, कमी वेळेत व मोठ्या प्रमाणावर ते बांधता येतात.
वनराई बंधारा बांधतानाच्या प्रमुख बाबी
1. जागेची निवड झाल्यावर तेथील 2.10 मी. रुंदीचा नालातळ फावड्याच्या सहाय्याने साफ करून घ्यावा. जेणेकरून खालून पाणी पाझरणार नाही.
2. सिमेंटची रिकामी पोती, वाळू व मातीच्या सहाय्याने भरून ती सुतळी व दाभणाने शिवून घ्यावीत.
3. बांध बांधण्याच्या ठिकाणी आतील बाजूस नाल्याच्या आतील सीमा दर्शविणारी नायलॉनची दोरी बांधावी व दोरीपासून 0.60 मी. बाहेर दुसरी दोरी लावावी.
4. नंतर दगड-मातीने भरलेल्या सिमेंटच्या गोणी गाभा भिंतीच्या आतील बाजूस प्रत्येकी 2 गोणीचे 8 थर व मध्ये 0.30 मी. मातीची गाभा भिंत व बाहेरील बाजूस खालून 4 गोणींचे 2 थर, नंतर 3 गोणींचे 3 थर, नंतर 2 गोणींचे 3 थर याप्रमाणे सांधेमोड पद्धतीने बांधकाम करावे.
5. वनराई बंधार्याला एका बाजूकडून अतिरिक्त पाणी खाली जाण्यासाठी वाट करून द्यावी.
6. गाभा भिंत भरताना मातीवर थोडेसे पाणी मारून धुम्मस करून ती पक्की करावी. अशा पद्धतीने जवळपास 1.05 मी. पाणीसाठा असलेला वनराई बंधारा तयार होतो व यात नालापात्राची रुंदी व उतार यानुसार उपयुक्त पाणीसाठा निर्माण केला जातो. या बंधार्याचे काम पावसाळा कमी झाल्याबरोबर नालाप्रवाह चालू असतानाच घेणे आवश्यक आहे.
#FTIJalna
#MahaForest
#forestguard
#PaniFoundationVideos