येथील भुईकोट किल्ल्यात अप्रतिम अशी पाय विहीर आहे. तिला नकट्या रावळाची विहीर असे म्हणतात. 12 व्या शतकातील ‘शिलाहार’ राजवटीत बांधलेली ही विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला, कोयनेच्या पात्रापासून सुमारे पंच्याहत्तर फूट उंचीवर आहे. विहिरीची लांबी 120 बाय 90 फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्यांच्या चोहो बाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. मुख्य विहीर अकराशे अकरा चौरस मीटरची आहे. तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो. एकूण 82 पायर्या असून प्रत्येक वीस पायर्या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते. पायर्यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते. विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चिर्यांचे आहे. ते चुन्यातून घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा दिसतात. विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडले जात असावे. त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणी पुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत, अशी नोंद गॅझेटियरमध्ये पहावयास मिळते.
चावडी चौक परिसरातील मनोरे, सोमवार पेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नकट्या रावळाची विहिरीमुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. आज बुरूंज या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत. 84 चौरस मीटर क्षेत्रावर कृष्णा - कोयनेच्या प्रीतिसंगम परिसरातील हा किल्ला थोरल्या शाहू महाराजांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला. आज किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष भग्नावस्थेत असल्याचे पहावयास मिळते. तर किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उद्धस्त झालेला आहे. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजे मराठाकालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण होते. वाड्याच्या दक्षिणेस 259 मीटर लांब - रूंद व 4 मीटर उंच असा दरबार हॉल होता. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानीदेवीची छत्री. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे. दरबाराच्या तक्तपोशीवर जाळीदार नक्षीकाम होते. परशुराम निवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास 1800 च्या सुमारास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले. आज किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरे, इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळेच आज किल्ला तेथे होता का? हा प्रश्न उभा पडल्याशिवाय रहात नाही ! कोयना पात्रालगतची तटबंदी 1875 च्या महापुरात नष्ट झाली असावी, असे सांगितले जात आहे. विहिरीचे अस्तित्व आजही कायम आहे. मात्र भुईकोट किल्ला जवळपास नामशेषच झाला आहे.
#NakatyaRavlyachiVihir#Karad#PantachaKot#History