इतरांना आनंद वाटून जगणं समृद्ध करा !
◆
समारोपीय व्याख्यानात संजय कळमकर यांचे आवाहन
◆
पूर्वी लोक आनंदी होते. मात्र आज आम्ही सुखी आहोत, घरात फोमची गादी आहे, पण झोप लागत नाही, खायला पंचपक्वान्न आहेत पण खाता येत नाही. आपण ज्याला त्याला आपले दुःख सांगत सुटतो म्हणून आपल्या जगण्यातील आनंद नाहीसा होत आहे.. तेव्हा प्रत्येकाने मनसोक्त आनंद वाटून आपलं जगणं समृद्ध केले पाहिजे असे आवाहन अहिल्यानगर येथील प्रसिद्ध विनोदी वक्ते संजय कळमकर यांनी काढले. ते महेश भवन येथे सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेत "जगण्यातील आनंदाच्या वाटा" या विषयावर बोलत होते.
प्रारंभी डॉ.अजय कांत यांनी वक्त्याचे स्वागत केले. नितीन उजवणे यांनी परिचय करून दिला. डॉ. रवी ठाकरे यांनी व्याख्यानमालेला सहकार्य करणाऱ्यांप्रति आभार मानले. दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला सहभागी होता आले पाहिजे मात्र तसे दिसत नाही ही बाब विनोदी शैलीत स्पष्ट करताना ते म्हणाले की, शेजाऱ्याला लॉटरी लागली म्हणून दुसरा शेजारी फटाके फोडत होता. हे पाहून सर्वांना कुतुहल वाटलं. वा! शेजारी असावा तर असा !मात्र नंतर लोकांच्या लक्षात आलं की, त्याचं तिकीट सापडत नव्हतं म्हणून शेजारी फटाके फोडत होता. अश्या असूयेमुळे आनंद मिळू शकणार नाही.. आज शिक्षण क्षेत्रातील स्थिती वाईट आहे. पैसा असला की, तुमचा मुलगा कमी मार्कांवर सुद्धा डॉक्टर होऊ शकतो... पण कल्पना करा दहा वर्षानंतर आपल्या आरोग्याची काय दशा होईल! म्हणून तोपर्यंत आनंदाने जगून घ्या.
समाजातील वाईट चालीवर त्यांनी विनोदी शैलीत अनेक किस्से सांगून लोकांना
मनसोक्त हसविले.मात्र त्यांच्या प्रत्येक विनोदाच्या पाठीमागे दुःख होते, खंत होती. व्हाट्सअप, फेसबुक यामुळे समाजात गोधळ उडत आहे,हे सांगून त्यामुळे माणसासमोर अनेक संकटे उभी होत आहेत.. माणसाने मोठमोठ्या अपेक्षा ठेवू नये त्यामुळे बऱ्याचदा आपल्या पदरी दुःख पडू शकते.. आनंद शोधण्याच्या अनेक वाटा आहेत, इतरांना मदत करून , वाचन करून आनंद मिळवता येतो. आज घराघरात आठ आठ मोबाईल आहेत, लाखो रुपयांचे घरगुती वस्तू आहेत, मात्र पुस्तके नाहीत. सुशिक्षित माणसं थोर पुरुषांचे फोटोही ओळखू शकत नाहीत अशी खंत व्यक्ती केली...
साने गुरुजी चा फोटो मित्राच्या घरी लावला होता.. तेव्हा दुसरा मित्र त्याला म्हणतो की, "वडील केव्हा गेले?" येथे विनोद निर्माण होत असला तरी ही बाब दुर्दवी आहे. आज तंत्रज्ञानामुळे नवीन प्रथा निर्माण होऊन संस्कृती विकृत होत आहे. लग्न व उत्सवाचे स्वरूप किळसवाणी होत आहे.. याचे भान ठेऊन . सर्वांनी जाणीवपूर्वक व निर्भयतेने जगले पाहिजे, आणि जगणं समृद्ध केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. व्याख्यानमालेचा आज समारोप होता.याप्रसंगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ दहिहांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. ६६ वर्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे व रसिकांचे स्मरण करून या दीर्घ प्रवासातील काहीं किस्से,हकीकती व चढउतार विशद केले.मनोगतात त्यांनी आपला अध्यक्ष पदाचा पदभार नविन पिढीच्या ताज्या कार्यकर्त्यांकडे सोपवित असल्याचे जाहीर केले,तसेच आपल्या जिवलग सहकाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करून यापुढेही सर्वांनी जोमाने ही माला अशीच पुढे न्यावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुशील देशपांडे यांनी केले तर निशिकांत परळीकर यांनी शारदा स्तवन म्हटले.
आजच्या व्याख्यानाला रसिकांची अमाप गर्दी होती.
.. परमेश्वर व्यवहारे