हे जग आणि मानवी जीवन यांना प्रभावित करणारी कोणतीही सर्वशक्तिमान अलौकिक शक्ती अस्तित्वात नाही. असे म्हणताना आम्ही कोणताही धार्मिक अभिनिवेश बाळगत नाही. “माझे नास्तिक्य विचारपूर्वक असून त्यात कोणताही अहंकार नाही”, असे शहीद भगतसिंग म्हणत. तीच आमची भूमिका आहे.
भारतीय राज्यघटनेत देखील उपासना स्वातंत्र्य मान्य करताना “ईश्वराचे अस्तित्व अमान्य करण्याचे स्वातंत्र्य”, आवर्जून नमूद केलेले आहे.
नास्तिक म्हणून आमची सर्वसाधारण ओळख आहे. तरी विचारांच्या वैविध्यामुळे काही जण स्वत:ला अज्ञेयवादी, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, मुक्तचिंतक इत्यादी नावानी संबोधतात.
प्राचीन काळापासून थोर नास्तिक होऊन गेले. त्यांचे सामाजिक विकासातील आणि इतर क्षेत्रातील जसे कला, विज्ञान, साहित्य योगदान लक्षणीय आहे. आजही अनेक नास्तिक राजकारण, साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक क्षेत्रात आघाडीवर काम करताना दिसतात. अशा सर्व नास्तिका सोबत आज आम्ही आपले ऐक्य घोषित करत आहोत.