#पुरणपोळी #पक्वान्न #गोडपदार्थ #पुरण #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
पुरणपोळी
पीठ कसे मळावे?
गव्हाचे पीठ १ वाटी
तेल ३ ते ४ चमचे
चिमूटभर मीठ
१ वाटी गव्हाच्या पीठात चिमूटभर मीठ टाकून पाणी आणि नंतर तेलाचा वापर करून सैलसर कणिक मळून ठेवावी. ही किमान २ तास तरी तशीच झाकून ठेवावी.
पुरण
चणाडाळ २५० ग्रॅम
गूळ २५० ग्रॅम
साखर दीड चमचा
जायफळ पूड १ चमचा
हळद अर्धा चमचा
साजुक तूप १ चमचा
तेल १ चमचा
चणाडाळ आधी स्वच्छ धुवून मग पाण्यात तासभर भिजत ठेवावी. नंतर त्यात हळद व एक चमचा तेल घालून कुकरमध्ये ठेवून कुकरच्या २ शिट्ट्या घ्याव्यात. कुकर उघडला की ही डाळ गाळून घ्यावी. डाळीतले पाणी कटाची आमटी करण्यासाठी वापरावे.
आता एका जाड बुडाच्या कढईत ही डाळ काढावी. गॅस मोठा ठेवावा. वरुन कलथ्याने कढईतच ही डाळ चेचून घ्यावी, जेणेकरून ती बऱ्यापैकी एकजीव होईल. डाळ एकजीव झाली की मगच त्यात गूळ घालावा. सगळे परत नीट मिक्स करून घ्यावे. पुरण होत आले की मग त्यात थोडीशी साखर घालावी. पुरण व्यवस्थित होत आले की ते कढईत गोळा व्हायला लागते. कढईला चिकटत नाही. आता गॅस बंद करून मग त्यात जायफळ पूड घालून नीट मिक्स करून घ्यावे.
आता पुरणाच्या जाळीवर हे पुरण काढावे. खाली एक पातेले ठेवावे. एका भांड्याच्या बुडाला साजुक तूप लावून त्याने हे पुरण दाबत दाबत राहावे, जेणेकरून खालच्या पातेल्यात आपल्याला मऊसूत पुरण मिळेल. या पुरणाला एक चमचा साजुक तूप लावून सगळे नीट मिक्स करावे. आता हे पुरण छान गार करण्यासाठी ठेवावे, मात्र ते झाकून ठेवावे, उघडे ठेवले तर ते कोरडे पडते. पुरण गार झाले की मग त्याचे गोळे करून घ्यावेत.
पोळपाटाला एखादे सुती कापड लावून खालच्या बाजूने घट्ट बांधून टाकावे. पोळपाटावर हलकेच मैदा शिंपडून घ्यावा.
कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याची पारी करावी. कणकेच्या जवळपास तिप्पट पुरणाचा गोळा घेऊन तो पारीवर ठेवावा. हलक्या हाताने पुरण दाबत साईडने पारी वर वर आणावी. पूर्ण वर आली की पारी बंद करावी. आता मैद्यात हलकेच घोळवून हलक्या हाताने पुरणपोळी लाटावी. शक्यतो आधी कडेकडेने लाटावी. अजिबात जोर देऊन नये. हात हलका ठेवावा. नवशिक्यांनी आधी छोटी पुरणपोळी लाटावी. जसजशी प्रॅक्टिस होईल तसतशी मोठी पुरणपोळी लाटावी.
तवा मध्यम गरम करून घ्यावा. लाटलेली पोळी तव्यावर घालावी. कलथ्याने कडेकडेला हलकेच दाब द्यावा. पोळीला फुगवटे आले की पोळी उलटवावी. दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित शेकून घ्यावी. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकली की अलगदपणे ताटात काढून वरुन छान साजुक तूप घालून गरमागरम सर्व्ह करावी.
Mrs.Aasawari Gogate
For all types of catering orders (Only Veg)
(Only what's app)
9890671930
मऊसुत पुरणपोळीसाठी कणिक कशी मळावी?
https://youtu.be/uif8_0ZIAUk?si=7sXT54WCjOV8Aqpv
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040