फसलेली जिलेबी || जिलेबी करण्याचा फसलेला घाट || लेखिका नीलिमा क्षत्रिय
स्वयंपाकघरातल्या अनेक पाककृतींमधे जिलेबी एक अवघड प्रकरण आहे. आकार, रंग, चव, पाकाची चाचणी, कुरकुरीतपणा, सगळंच परफेक्ट जमलं तर बरं. नाहीतर कुत्रं नाही सापडत हाल खायला. स्वयंपाकात माझं प्राविण्य तसं ठिकठाक. पण मला एकदा काय अवदसा आठवली काय माहीत मी एकदम जिलेबीलाच हात घातला. एका घरगूती कार्यक्रमात आचा-याला सामान पुरवता पुरवता त्याच्याकडून जिलेबी बनवणं किती सोपं आहे ते पाहिलं. डोक्याला मळकट पंचा गुंडाळलेल्या आचा-याच्या हातातल्या फडक्याच्या पुरचुंडीतून परातीसारख्या कढईत सरासर उतरणा-या जिलेब्या पाहून मला एकदम माझं पाककौशल्य आजमावून बघावंसं वाटलं.
दोन जिलेब्या तरी तेलात सोडून पहाव्यात असं फार मनात आलं. पण आचा-याने मांडलेला पसारा, त्याच्यापलीकडची त्याची पत्र्याच्या डब्यावरची बैठक, आणि इतर ज्युनिअर आचा-यांशी हिंस्त्र भाषेतला त्याचा वार्तालाप बघून मी मनाला आवर घातला. आणि त्यादिवशी जिलेबी खाण्यावरच प्रकरण आवरतं घेतलं.
पण नंतर महिना उलटला तरी जिलेबी प्रकरण डोक्यातून काही जात नव्हतं.
मग एकदा मी तो जिलेबीचा घाट घातलाच. त्याला आवश्यक ते यिस्ट वगैरे अनोळखी पदार्थांची खरेदी झाली. आदल्या दिवशीच पीठ बनवायला घेतलं , आचा-याकडून मिळवलेल्या रेसिपीच्या आधाराने पीठ भिजवलं. रात्रभर झाकून ठेवलं. एक फडकं छोटं काजं करून रात्रीच तय्यार करून ठेवलं. जिलेब्या उलटायला, काढायला लोकरीच्या विणकामाची एक जुनी सुई पण शोधून ठेवली.
माझ्याकडे पोळ्याला एक जया नावाची मुलगी होती. ती सकाळीच नऊला यायची. पोळ्या झाल्या की ओटा बिटा स्वच्छ करून जायची. नंतर नको परत रहाडा करायला म्हणून मी तिच्या येण्याच्याा आधीचा... म्हणजे सकाळी आठचाच मुहूर्त धरला. सगळी जय्यत तयारी केली. तेल तापत ठेवलं. नेमकी दारावरची बेल वाजली म्हणून तिकडे धाव घेतली, तर पेपरवाला बिल घ्यायला आला होता. खूप चपळाई करून त्याला बिलाचे पैसे दिले. नेमके त्याच्याकडे सुट्टे नव्हते. मग त्याने नेहमीप्रमाणे 'तुमच्याकडे दहा आहेत का मी पाच देतो'.. वगैरे सुरू केलं.. म्हटलं 'राहू दे आता , नंतर बघू.' आणि त्याला कटवत गॅसवरच्या तेलाकडे धाव घेतली. तोपर्यंत तेलाने उग्र रूप धारण केलं होतं. आणि त्याच्यावर आता धूर घोंगावत होता. प्रतिक्षिप्त क्रियेनं मी आधी फट्टकन गॅस बंद केला. मनातल्या मनात पेपरवाल्याचा मुडदा बसवला... जिलेबी बनवायला घेण्याचा निर्णय जरा चुकला की काय अशी पाल मनात चूकचूकली... पण निग्रहाने ती पाल हुसकत मी ते जळालेलं तेल दुस-या भांड्यात काढून ठेवलं. आता ओट्यावरचा पसारा वाढत चालला होता. हे करत असतानाच नेमका आमचा मन्या 'म्याव म्याव' करत पायात आला. त्याला पायाने सरकवण्याच्या नादात तेलाने ओट्यावर झेप घेतली. तरी पण मी काय डगमगते का? पायात लुडबुडणा-या मन्याकडे आणि त्या सांडलेल्या तेलाकडे संपूर्ण दूर्लक्ष करून पुन्हा नवा गडी नवा राज प्रमाणे नविन तेल कढईत ओतले. तेलाला विशिष्ट तापमान प्राप्त झाल्यावर देवाचं नाव घेत जिलेबीचा पहिला घाना टाकला. पण टाकताना तेलाच्या आचेमुळे हात जरा लांब धरल्याने तेल उडून, कढईतल्या तेलाने मनगटावर जळजळीत नक्षीच काढली. पण त्या नक्षीला कुरवाळायला आता वेळच नव्हता. आता फक्त आणि फक्त मिशन जिलेबी... सोडलेल्या जिलेब्या आता तेलात शांतपणे पोहत होत्या. जिलेबीच्या वळणांमधे पण एक सरळपणा असतो ते मला कढईतल्या माझ्या नागमोड्या वळणाच्या जिलेब्यांकडे बघून जाणवलं. दूसरी गोष्ट म्हणजे जिलेब्या फारच बाळसेदार दिसत होत्या.
#marathikathakathan
#marathikathan
#marathi
#marathilekhika
#नीलिमाक्षत्रिय
#nilimakshatriya
#मराठीकथा
#विनोदीकथा
#मराठीकथाकथन
#कथाकथन
#storytelling
story telling
storytelling