लग्नात लग्न (भाग सातवा) || छक्के पंजे || भन्नाट विनोदी कथा || लेखिका नीलिमा क्षत्रिय
मागच्या भागात आपण पाहिलं की हो नाही करता करता मुला, मुलीची पसंती झाली. आता पुढे..
"पुढच्या रविवारी रुपया नारळ करून टाकू" असा निरोप मंडळी जाता जाता देऊन गेली. आता रुपया नारळाची जंगी तयारी सुरू झाली. मुलाला कपडे आणले, अंगठी आणली. मुलीच्या अंगठीचं माप दिलं.
मुलाकडचे म्हणत होते, 'अंगठीचं माप देण्यापेक्षा तुमची तुम्ही आणा, आमची आम्ही आणतो. पैसे एकमेकांना देऊन टाकू'. पण सुनीताने ते हाणून पाडलं. 'मापच द्या' म्हणून सांगितलं. खूप जास्त वजनाची घेऊन आले तर काय घ्या. नेट पाच ग्रॅम मध्ये बरोबर अंगठी बसवली. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पाट, चौरंग माळ्यावरून खाली घेतले गेले. आदल्या दिवशी जाऊन लॉकरमधून चांदीची भांडी, दागिणे वगैरे काढून आणले. ब्राह्मण वगैरे सगळं योजून ठेवलं. रविवारचा दिवस बघून रूपया नारळाचा कार्यक्रम ठेवला. मुलाकडचे कार्यक्रम घरीच करा म्हणत होते पण सुनीताच्या मिस्टरांनी जवळच असलेला छोटासा हॉल ठरवला. सुनीताने घाई घाईत सांगून टाकलं. "ते पाहुणे आल्यापासून पाणी, चहा, कॉफी, जेवण सगळेच केटरर कडे देऊन टाका. इथे आपल्याकडे कोण आहे पळायला".
बायको म्हणेल तशी मान डोलवायची चांगली सवय सुनीताने नव-याला लावून ठेवलेली आहे. रूपया नारळ निर्विघ्न पार पडला. लग्नाची तिथी ठरवताना मात्र एकमत होईना. तेव्हा मुलाकडच्यांनी चार-पाच सोयीच्या तारखा सांगून ठेवल्या आणि तुम्हीच ठरवा म्हणून सांगितलं. माझी मावशी म्हणजे सुनीताची आई खटल्याच्या घरात दिलेली, त्यामुळे सुनिता खटल्याच्या घरात वाढलेली. त्यामुळे कोणाला कधी कसं कितपत वापरायचं, कधी खुंटीला टांगायचं ह्यात ती बरीच पटाईत होती. त्यामानाने सुनीताचं सासर सुटसुटीत कुटुंब. सासू नर्स म्हणून रिटायर झालेली. सासरे शिक्षक होते ते नुकतेच वारले होते. वकील नवरा, एक प्रोफेसर दीर, बँकेत नोकरीला असलेली एक जाऊ आणि मुंबईत डॉक्टर असलेली नणंद इतकाच काय तो पसारा. सगळे सुशिक्षित आणि कुठलेही छक्के पंजे अवगत नसलेली मंडळी. सासू मात्र आता सुनीताचं पाहून पाहून हे सगळ शिकलेली पण मुळात स्वभाव तसा नसल्याने आणि कधी हा खेळ खेळलेला नसल्याने सुनिताच नेहमी घरातल्या कारस्थानांमध्ये बाजी मारते. इथून पुढे तिथी काढणे.. हे सगळं चाललेलं असताना सुनीताचं एकीकडे नाते गोते खेळवणं चाललेलं होतं. तिचं हे दिव्य कसब अनुभवण्याचा योग मला हे लग्न ठरवताना पासून ते पार पडेपर्यंत आला.
लगेच दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाकडून मुहूर्त काढून आणण्यासाठी आम्ही दोघी गेलो. पण ब्राह्मण कुठेतरी पूजा विधी मध्ये अडकलेला होता. त्याला संध्याकाळी घरी येण्याचा निरोप ठेवून आम्ही घरी आलो. नंतर ब्राह्मणाचा फोन आला. संध्याकाळी सातला येतो म्हणाला. सुनिताचा नवरा हो हो म्हणणार तोच सुनीताने त्याला खोडून काढत पाचच्या आतच यायला सांगितलं. सुनिताची सासू पण सातला सांग म्हणत होती म्हणजे सुनिताच्या जावेला दिराला पण येता आलं असतं. पण सुनीताने मग पाचच लावून धरलं. मलाही कळेना पाच वाजता काय असा वेगळा मुहूर्त काढून मिळणार होता हिला. पाचला ब्राह्मण आला. पंचांगाप्रमाणे त्याने मार्चपासून जुलै पर्यंत पंधरा-वीस तारखा काढून दिल्या. सुनीताने जूनच्या तारखांवर जास्त भर दिला आणि कोणाला जास्त बोलू न देता हॉलच्या रिकाम्या तारखा बघत पंधरा जून तारीख फायनल केली. लगेच ऑनलाईन ऍडव्हान्स वगैरे भरून हॉल पण बुक केला. ब्राह्मण गेल्यावर सुनीताने लगेच फोनाफोनी सुरू केली. पहिला फोन नणंदेला.. "हॅलो काय म्हणता वन्स बाई.. केली ना तुमच्या भाचीची तारीख फिक्स"
नणंद कौतुकाने बोलली "हो का? अरे वा वा! कोणती तारीख धरली गं ?"
"पंधरा जून.. आता दोनच महिने राहिले बरं!आत्या बाईंनी आणि त्यांच्या लेकीने महिनाभर तरी आधी यायला पाहिजे".
नणंदेचा आवाज एकदम बारीक झाला. "अगं वहिनी सुमाची मेडिकलची परीक्षा आहे ना 16 जूनला.. तिला तर लग्नाला पण येता येणार नाही. "
"अरे हो, तुम्ही बोलल्या होत्या वाटतं मला.. पण माझ्या मेलीच्या काही लक्षात राहील तर ना? पण असू द्या ना! तुम्ही या महिन्याभर आधी."
नणंद उदास होत म्हणाली, "आता तिची परीक्षा असताना मी कशी काय राहू शकेन? असू दे पण, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही दोघं लग्नाला येऊ, पण फक्त ऐनवेळी येऊ एवढंच".
#marathi
#kathakathanmarathi
#marathikathakathan
#marathikathan
#नीलिमाक्षत्रिय
#nilimakshatriya
#marathikahaniya
#hasayan
#shankarpatil
#deepakrege
#storytelling
story telling
storytelling