संत गाडगेबाबा व बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते काय ? The relationship between Gadge Baba and Babasaheb
#बाबासाहेब_आंबेडकर_इतिहास
#बाबासाहेब_आंबेडकर
#भीमराव_आम्बेडकर
#BhimraoAmbedkar
https://youtu.be/hZ0EVzF4UWU
“अरे बापहो, देव हा दगडात नसून माणसातच आहे. या जिवंत देवाची सेवा करा. भुकेलेल्यांना अन्न द्या. तहानलेल्यांना पाणी पाजा. उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करा. बेघरांना आसरा द्या. अंध-अपंगांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून द्या. दुःखी-निराश झालेल्यांना हिम्मत द्या. आणि गोरगरिबांना शिक्षण द्या. हीच खरी देवपूजा आहे, हाच खरा धर्म आहे.” असा रोकडा धर्म म्हणजेच खराखुरा व्यावहारिक उपदेश करणारे संत म्हणजे संत गाडगेबाबा.
डेबूजी झिंगराजी जानोरकर असे गाडगे बाबांचे नाव होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेंडगाव येथे, 23 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ‘झिंगराजी राणोजी जानोरकर’ तर आईचे नाव ‘सखुबाई’ होते.
1892 साली वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. त्याकाळी लग्नात दारू आणि मटनाचे जेवण देण्याची प्रथा होती. परंतु गाडगे बाबांनी ती प्रथा मोडीत काढून आपल्या लग्नात गोडधोड जेवण दिले.
विवाहानंतर त्यांना चार मुली सुद्धा झाल्या. परंतु ते फार काळ संसारात रमले नाहीत. 1 फेब्रुवारी 1905 रोजी, घरादाराचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला. त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले. गावोगावी फिरून ते दिवसा झाडूने गाव स्वच्छ करीत आणि रात्री आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अज्ञान आणि अंधश्रद्धेची घाण साफ करीत.
गाडगे बाबांचे कीर्तन खूपच प्रभावी असायचे. आचार्य अत्रे गाडगे बाबांचे वर्णन करताना म्हणतात, “सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात आणि गाडगे बाबांना पहावे कीर्तनात.”
गाडगे बाबा आपल्या कीर्तनात म्हणायचे, “अरे तुम्ही पंढरीला जाता, अनेक ठिकाणी देवदर्शनाले जाता, पण तुमचा देव कधी बोलतो का तुमच्याशी? अरे तुमचा देव नैवेद्य खाणाऱ्या कुत्र्याला हाड बी म्हणत नाय.”
“खरा देव देवळात नसून तो माणसांत आहे. देव देव करून तुमच्या समस्या सुटणार नाहीत तर समस्यांच्या निराकरणासाठी शिक्षण आवश्यक आहे.”
“बेघरांना घर द्या. अंध, अपंगांना औषधोपचार द्या. बेकारांना कामधंदा द्या. विद्यार्थ्यांना शिक्षण द्या. गरिबांच्या लग्नात मदत करा. मुक्या जनावरांना संरक्षण द्या. मुक्या जनावरांची बळी देणे बंद करा. चोरी करू नका. सावकाराचे कर्ज काढू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.”
अशी शिकवण गाडगे बाबा कीर्तनातून देत असत. अशा शिकवणुकींमुळे गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक वैचारिक, भावनिक नाते निर्माण झाले होते.
गाडगे बाबा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य करीत होते. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य करीत होते.
गाडगे बाबा आपल्या कीर्तनात शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना म्हणायचे, “जेवणाचे ताट मोडा, भाकरी हातावर खा पण आपल्या लेकराले शिक्षण द्या. गरीब माणसाचा मुलगाही शिकून मोठा होऊ शकतो, अनेक पदव्या मिळवू शकतो. हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कष्टाने शिकले आणि मोठे झाले.”
गाडगे बाबा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बऱ्याचदा एकमेकांना भेटायचे, सामाजिक सुधारणांच्या विषयावर चर्चा करायचे.
14 जुलै 1941 रोजी, गाडगे बाबा आजारी असल्याची बातमी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समजली. त्यावेळी बाबासाहेब कायदेमंत्री होते. ते दिल्लीला जायला निघाले होते. पण ते टाळून बाबासाहेब मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गाडगे बाबांना भेटायला गेले. त्यांनी आपल्या सोबत दोन घोंगड्या गाडगे बाबांना भेट देण्यासाठी आणल्या होत्या. गाडगे बाबा कुणाकडूनही कोणतीच भेटवस्तू घेत नसत पण त्यांनी बाबासाहेबांनी आणलेल्या घोंगड्या स्विकारल्या. त्यावेळी गाडगे बाबा बाबासाहेबांना म्हणाले, “तुम्ही कशाला आले डॉक्टर साहेब? मी आपला फकीर माणूस, तुमचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. किती मोठा अधिकार आहे तुमचा?”
त्यावर बाबासाहेब म्हणाले,”बाबा, माझा अधिकार दोन दिवसाचा आहे. खुर्ची गेल्यावर उद्या मला कोणी विचारणार नाही. तुमचाच अधिकार मोठा आहे.”
बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला गाडगे बाबांनी पंढरपूरची त्यांच्या वस्तीगृहाची इमारत दान केली होती.
लोकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून गाडगे बाबांनी शाळा, धर्मशाळा, रुग्णालये, प्राण्यांसाठी निवारे बांधले. त्यांनी बांधलेल्या बऱ्याच संस्था आजही कार्यरत आहेत.
“जनतेचे महान सेवक” असे म्हणून बाबासाहेबांनी गाडगे बाबांचे वर्णन केले आहे.
एकदा कीर्तनात असताना गाडगे बाबांना त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची बातमी समजली. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही आला नाही. उलट ते म्हणाले, “ऐसे किती गेले कोट्याने, का रडू एकासाठी?”
आणि असे म्हणणारे हेच गाडगे बाबा जेव्हा बाबासाहेबांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले तेव्हा अन्न व पाण्याचा त्याग करून सतत 14 दिवस रडत होते. आणि 15 व्या दिवशी म्हणजेच 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांचेही निर्वाण झाले.
इतके घट्ट भावनिक नाते बाबासाहेब आणि बाबांचे होते.
महाराष्ट्र शासनाने 2000 साली गाडगे बाबांच्या नावाने स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानात ग्रामस्थांना बक्षिसे दिली जातात. तसेच शासनाने अमरावती विद्यापीठाला “संत गाडगे बाबा विद्यापीठ” असे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
आपल्या कृतीतून स्वच्छतेला उच्च प्राथमिकता देणाऱ्या, आपल्या कीर्तनातून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दांभिकता यांवर प्रहार करून आपल्या मानव केंद्रीत तत्त्वज्ञानाने, सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या आणि मानवतेची सेवा करणाऱ्या या राष्ट्रसंत गाडगे बाबांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम 🙏