'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ह्या महेश एलकुंचवारांच्या तीन गाजलेल्या नाटकांचा सलग आठ तास, एकसंध प्रयोग सादर करणारे चंद्रकांत कुलकर्णी हे प्रतिभावान नाट्यदिग्दर्शक माहीत नाहीत असा मराठी रंगकर्मी किंवा नाट्यरसिक जगभरात शोधूनही सापडणार नाही.
आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीत चंदू सरांनी त्रिनाट्यधारेखेरीज 'रंग उमलत्या मनाचे', 'चारचौघी', 'गांधी विरुद्ध गांधी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा', 'यळकोट', 'ध्यानीमनी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'चाहूल', 'आषाढ बार', 'हॅम्लेट' या आणि अशा अनेकोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत.
संहितेचा एकंदर आशयच नव्हे तर त्यातला शब्दनशब्द आपलासा करुन अत्यंत चोख तयारीने चंदू सर नाटक उभं करण्याच्या प्रक्रियेला सामोरे जातात. मात्र हे काटेकोर नियोजन, नाट्यशास्त्राचा केलेला रीतसर अभ्यास, अनेक व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचा अनुभव ह्यांपैकी कशाचंही ओझं मात्र ते होऊ देत नाहीत. अतिशय तन्मयतेने, उत्स्फूर्तपणे आणि बारकाईने सादरीकरणाच्या विविध शक्यता ते नटांबरोबर आणि तंत्रज्ञांबरोबर पडताळून पाहतात; आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांना एक रसरशीत, नावीन्यपूर्ण रंगानुभव देण्याचा प्रयत्न करतात.
संहितेचं पुनर्लेखन ही दिग्दर्शकाने नाटककाराला स्वतःच्याच विचारांशी करून दिलेली पुनर्भेट कशी असते, प्रत्यक्ष उभं राहण्यापूर्वी नटाने संवादांवर काय काम करावं, नाटकातील हालचाली आणि आकृतीबंध हे मुद्दामहून ठरवण्याऐवजी आपोआप उमलू कसे द्यावेत, नेपथ्य आणि संगीताचा वापर द्विमितीतील रंगमंचीय अवकाश त्रिमितीत परिवर्तित करण्यासाठी कसा करावा, प्रयोग हलू नये म्हणून काय काळजी घ्यावी, काही सुचत नसेल अशा वेळी दिग्दर्शकाने काय करावे अशा अनेक रोचक विषयांवर चंदू सर आज बोलणार आहेत.