"आपल्या बहुतांश संहितांमधले संघर्ष थिटे असतात. मोठे संघर्ष असलेल्या संहिता लिहिल्या जात नाहीत म्हणून मोठे नट निर्माण होत नाहीत."
- संजय मोने
'ऑथेल्लो', 'पूर्णावतार', 'सविता दामोदर परांजपे', 'दीपस्तंभ', 'रमले मी', 'श्रीमंत', 'लग्नाची बेडी', 'आम्ही जगतो बेफाम', 'कुसुम मनोहर लेले', 'शेवग्याच्या शेंगा', 'तो मी नव्हेच', 'डिअर आजो' अशा ५० हून अधिक नाटकांतून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे सुविख्यात नट संजय मोने जगभरातील मराठी रसिकांचे लाडके कलाकार आहेत.
संहिता निवडताना त्यातील संघर्ष आणि नाट्य एका विशिष्ट उंचीचं असावं ह्याचा आग्रह धरणारे संजय सर गेली ३५ वर्षं रंगभूमीवर डोळसपणे कार्यरत आहेत. रोजच्या निरीक्षणातून टिपलेले क्षण, संगती-विसंगती आणि व्यक्तिविशेष मिळालेल्या भूमिकेसाठी वापरून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. ह्याचा प्रत्यय त्यांनी बारकाव्याने साकार केलेल्या गंभीर आणि विनोदी दोन्ही प्रकारच्या, विविधतापूर्ण व्यक्तिरेखांतून नेहेमी येत राहतो.
आपल्या अभिनप्रक्रियेबरोबरच मराठी रंगभूमीवरील नाटक निर्मितीच्या, लिखाणाच्या, आणि बसवण्याच्या कार्यपद्धतीबद्दल संजय सरांना कळकळ आहे. आणि म्हणूनच रंगभूमीशी निगडित काही ढिसाळ आणि बेजबाबदार प्रवृत्तींबद्दल ते सडेतोडपणे बोलतात. आजच्या भागात ऐकूया संजय सरांचे ह्या सगळ्याबद्दलचे मनोगत.